धाराशिव: उसने घेतलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ५५ वर्षीय व्यक्तीची काठीने मारहाण करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील सांजा येथील संत गोरोबा काका नगरमध्ये घडली. मधुकर चंदर कोळगे (वय ५५, रा. केशेगाव, ता. जि. धाराशिव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी मयत मधुकर कोळगे यांचे पुत्र मारुती मधुकर कोळगे (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात अमित झेंडे आणि त्यांचा मुलगा (नाव अद्याप अज्ञात) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित झेंडे आणि त्यांच्या मुलाने ११ जुलै २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास मधुकर कोळगे यांना पैशांच्या कारणावरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी कोळगे यांना काठीने जबर मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर, मारुती कोळगे यांनी १२ जुलै २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बाप-लेकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




