धाराशिव : शहरातील बोंबले हनुमान मंदिर परिसरात अवैध दारू विक्री, हातभट्टी आणि पत्त्यांचे डाव सर्रासपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप करत, मंदिराचे पुजारी अनंत अण्णासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या अवैध धंद्यांमुळे गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढला असून, ते मंदिरात आणि अन्नछत्रामध्ये घाण टाकून, तसेच पूजेचे साहित्य काढून फेकून धार्मिक भावना दुखावत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार अनंत पाटील हे बोंबले हनुमान मंदिरात पूजापाठ आणि देखभालीचे काम करतात. मंदिराच्या परिसरात ते एक अन्नक्षेत्र देखील चालवतात, जिथे दर मंगळवारी आणि शनिवारी भाविकांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नदान केले जाते.
पाटील यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, मंदिराच्या सार्वजनिक परिसरात अवैध दारू आणि हातभट्टी दारू विक्रीचे व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. या ठिकाणी दारू पिण्यासाठी येणारे आणि इतर गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांच्या अन्नक्षेत्राच्या ठिकाणी मांसाहारी पदार्थ, जसे की हाडे आणि मांस, आणून टाकतात. इतकेच नव्हे, तर मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीला अर्पण केलेले पूजेचे साहित्य आणि फुलांचे हार देखील काढून टाकले जातात.
या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून आपल्याला आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून, धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
या तक्रारीच्या माध्यमातून, पाटील यांनी बोंबले हनुमान मंदिर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूच्या दुकानांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, भाविकांना त्रास देऊन धार्मिक भावना दुखावणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
ही तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव येथे ९ जुलै २०२५ रोजी दाखल करण्यात आली असून , पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि धाराशिव शहर पोलीस निरीक्षकांकडे पाठवण्यात आली आहे.