परंडा – भुम-परंडा रस्त्यावर अवैधरित्या गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला परंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या बोलेरो गाडीतून सुमारे ५०० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, वाहन आणि मांसासह एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी, १४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी रमजान फरीद शेख (वय २०, रा. बावची, ता. परंडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, त्यांनी वारदवाडी ते भुम रस्त्यावर सापळा रचला होता. यावेळी संशयित बोलेरो गाडी (क्र. एमएच ४३ व्ही २०४४) थांबवून तिची तपासणी केली असता, त्यात ५०० किलो गोवंश मांस आढळून आले.
हे मांस विक्रीच्या उद्देशाने नेले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तात्काळ वाहन आणि मांस जप्त करून आरोपी रमजान शेख याला ताब्यात घेतले.
या घटनेप्रकरणी, पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलम ५(क), ९, आणि ९(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. परंडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.