तुळजापूर/नळदुर्ग: तुळजापूर तालुक्यात चोरट्यांचा वावर वाढला असून, वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी दोन मोटारसायकली आणि एक शेतीची पानबुडी चोरून नेली आहे. याप्रकरणी नळदुर्ग आणि तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अणदुर येथून दोन मोटारसायकली लंपास
पहिली घटना नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अणदुर येथे घडली. फिर्यादी शरद गोविंद मोरे (वय ३६, सध्या रा. व्यासनगर, नळदुर्ग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची २०,००० रुपये किमतीची हिरो फॅशन एक्स प्रो मोटारसायकल (क्र. एमएच १५ एफपी ५०९३) आणि बाबुराव महादेव वर्दे यांची २०,००० रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच १२ क्युके २०६४) या दोन्ही गाड्या ३ जुलै रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५:३० च्या दरम्यान अणदुर येथील जिल्हा परिषद शाळेजवळील रस्त्यावरून अज्ञात चोराने चोरून नेल्या. या घटनेची तक्रार शरद मोरे यांनी सोमवारी, १४ जुलै रोजी दिल्यानंतर नळदुर्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
विहिरीतून पानबुडीची चोरी
दुसरी घटना तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तुळ) शिवारात घडली. शेतकरी महादेव राजेंद्र शिरसट (वय ५९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या शेत गट क्रमांक ७० मधील विहिरीत असलेली १०,००० रुपये किमतीची ५ एचपी क्षमतेची ॲनसन कंपनीची पानबुडी (सबमर्सिबल पंप) अज्ञात चोराने चोरून नेली. ही चोरी १३ जुलै रोजी रात्री ८ ते १४ जुलै रोजी सकाळी ७ च्या दरम्यान घडली. शिरसट यांनी सोमवारी, १४ जुलै रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
एकाच दिवशी तालुक्यात चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलीस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.