उमरगा: शहरातील मोमीन मस्जिद परिसरात चारित्र्याच्या संशयातून महिलेची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी उमरगा पोलिसांनी २४ तासांच्या आत छडा लावला आहे. पोलिसांनी मयत महिलेच्या प्रियकराला पुण्यामधून अटक केली असून, न्यायालयाने त्याला १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. माधव पांडुरंग पाचंगे (वय ४४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शहरातील पतंगे रोड येथील रहिवासी माया रमेश शिंदे (वय ४५) यांचा मृतदेह १३ जुलै रोजी त्यांच्या राहत्या घरी आढळून आला होता. त्यांच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण असल्याने खुनाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी मयत महिलेची मुलगी रोहिणी पाटोळे (रा. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच उमरगा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी माया शिंदे यांचा प्रियकर माधव पाचंगे हाच आरोपी असल्याचे निष्पन्न केले. आरोपीचा शोध घेतला असता तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, उमरगा पोलिसांच्या पथकाने दि. १४ जुलै रोजी रात्रीच पुण्यामधून आरोपी माधव पाचंगे याला अटक केली.
तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. माया शिंदे यांच्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन आणि कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या रागातून, आपणच दि. १२ जुलै रोजी रात्री गमजाने (रुमालाने) गळा आवळून तिचा खून केल्याचे आरोपीने सांगितले.
आरोपीला मंगळवारी (दि. १५) उमरगा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास दि. १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आरोपी पाचंगे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर यापूर्वीही मारहाण आणि धमकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि त्यांच्या पथकाने केली आहे.