येरमाळा – महामार्गावर धावत्या ट्रकची ताडपत्री फाडून त्यातून माल चोरणारी ‘ताडपत्री’ टोळी येरमाळा परिसरात पुन्हा सक्रिय झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. येरमाळा ब्रिज ते वडगाव ब्रिज दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी धावत्या ट्रकची ताडपत्री फाडून सिल्क साड्या, कपडे आणि शेतीसाठी लागणाऱ्या खताच्या बॉक्ससह सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रक चालक दिनेश शिवराज गवशेट्टी (वय ४०, रा. सोलापूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. गवशेट्टी हे आपल्या केए २५ एए ०५२७ या क्रमांकाच्या ट्रकमधून अहमदाबादहून बंगळुरूकडे कंपनीच्या पार्सलची वाहतूक करत होते. २२ जुलै रोजी रात्री ११:५० ते २३ जुलै रोजी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास येरमाळा ब्रिज ते वडगाव ब्रिज या दरम्यानच्या प्रवासात असताना हा प्रकार घडला. अज्ञात चोरट्यांनी धावत्या ट्रकची ताडपत्री धारदार शस्त्राने फाडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी ट्रकमधील १३ सिल्क साड्या, १४४ रेडीमेड कुर्ती, ११ लेडीज ड्रेस, २ पंजाबी सूट आणि ‘अग्रेबॉक्स फायटर’ नावाच्या शेतीतील खताचा एक बॉक्स असा एकूण ५७,९७४ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
या घटनेनंतर ट्रकचालक दिनेश गवशetti यांनी २५ जुलै रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे या मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.