धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, नळदुर्ग आणि उमरगा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मोटारसायकली आणि हजारोंच्या किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेले आहे. या सर्व घटनांसंदर्भात ३१ जुलै रोजी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नळदुर्ग: घरासमोरून मोटारसायकल चोरीला
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सलगरा (ता. तुळजापूर) येथील महेश तुकाराम सोनवणे (वय २६) यांची ४०,००० रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच २५ ए.वाय. ६०३३) घरासमोरून चोरीला गेली. २५ जुलै रोजी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तुळजापूर: बसस्थानकातून दुचाकी लंपास
दुसरी घटना तुळजापूर शहरात घडली. येथील शिवरत्न नगरचे रहिवासी असलेले बालाजी बाबुराव ढवन (वय ५५) यांची ३०,००० रुपये किमतीची एचएफ डिलक्स कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच २५ ए.एन. ९३२२) जुने बसस्थानक परिसरातून २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चोरी झाली. याप्रकरणी बालाजी ढवन यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा: बांधकाम साहित्यावर डल्ला
उमरगा शहरातील जिजाऊ चौक परिसरात राहणारे प्रदीप गुलाबराव भोसले (वय ४५) यांच्या घराच्या बांधकामावरील साहित्य चोरीला गेले आहे. ३० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी १५,४०० रुपये किमतीचे साहित्य चोरले. यामध्ये २०० किलो सळईचे तुकडे, बायडिंग तार आणि खिळे यांचा समावेश आहे. याप्रकरणी उमरगा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
एकाच दिवशी जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल झाल्याने चोरांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलीस या सर्व प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.