धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी आणि शेतसाहित्य चोरीच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरे फोडून रोख रक्कम आणि मोबाईल लंपास करण्यात आला, तर नळदुर्ग परिसरात शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत. दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रुईभरमध्ये खिडकीतून प्रवेश करत दोन घरे लुटली
बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुईभर येथे चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरांना लक्ष्य केले. येथील रहिवासी शाम भगवान मते (वय ४५) यांच्या घरात दि. ३१ जुलैच्या रात्री १० ते दि. १ ऑगस्टच्या पहाटे ३.३० च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने खिडकीतून आत प्रवेश केला. चोरट्याने मते यांच्या पॅन्टच्या खिशातून ३५,००० रुपयांची रोख रक्कम आणि एक मोबाईल फोन चोरून नेला. त्यानंतर चोरट्याने शेजारीच असलेल्या संदीपान नामदेव वडवले यांच्या घरातूनही ४,००० रुपयांची रोख रक्कम लंपास केली.
या दोन्ही घटनांमध्ये एकूण ४४,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी शाम मते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
काटगाव शिवारातून २५ हजारांच्या पाण्याच्या मोटारी लंपास
दुसरी घटना नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील शेतकरी रविकिरण सुरदास माळी (वय ३२) यांच्या काटगाव शिवारातील शेत गट क्र. ८८/३ मधून अज्ञात चोरट्यांनी पाण्याच्या मोटारी चोरून नेल्या. दि. ३० जुलैच्या रात्री ते ३१ जुलैच्या सकाळच्या दरम्यान हा प्रकार घडला.
चोरट्यांनी लाढा लक्ष्मी आणि ओसवाल कंपन्यांच्या प्रत्येकी ५ एचपी क्षमतेच्या दोन पाणबुडी मोटारी, तसेच एक सौरऊर्जेवर चालणारी आणि एक विजेची पाणबुडी मोटर अशा एकूण चार मोटारी चोरून नेल्या. या मोटारींची एकूण किंमत २५,००० रुपये आहे. याप्रकरणी रविकिरण माळी यांच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या शेतसाहित्य चोरीच्या घटनांमुळे परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.