उमरगा : तालुक्यात अवैध धंद्यांवर बंदी घालण्यासाठी निवेदन देणारे सामाजिक कार्यकर्तेच अवघ्या १२ तासांच्या आत जुगार खेळताना पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार उमरगा येथे घडला आहे. उमरगा पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे ढोंगी सामाजिक कार्यकर्त्यांचे बिंग फुटले असून, या घटनेची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मौजे कदेर आणि सेवानगर तांडा येथील अवैध दारू विक्री आणि जुगाराचे अड्डे त्वरित बंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन सामाजिक कार्यकर्ते रोहित चव्हाण, आकाश राठोड व इतर ग्रामस्थांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उमरगा पोलिसांना दिले होते.
या निवेदनाची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या पथकाने त्याच दिवशी संध्याकाळी कारवाईचे नियोजन केले. गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सेवानगर तांडा आणि कदेर शिवारात अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर छापे टाकले.
पोलिसांची मोठी कारवाई:
- अवैध दारू विक्री: सेवानगर तांडा येथे वसंत राठोड आणि शिवाजी राठोड यांच्यावर छापा टाकून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अनुक्रमे ६,५०० रुपये किमतीची ६५ लिटर आणि ७,००० रुपये किमतीची ७० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली.
- जुगार अड्ड्यांवर छापे: पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकले.
- सेवानगर तांडा: येथे गुलाब चव्हाण याच्या घरासमोर जुगार खेळणाऱ्या ८ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम, ७ मोबाईल फोन, एक कार (MH-25 BA-1228), एक मोटारसायकल (UP-32 KF-6934) असा एकूण ८,२३,११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
- कदेर शिवार: येथील लक्ष्मी मंदिरासमोर जुगार खेळणाऱ्या ६ जणांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम, २ मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १६,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
निवेदनकर्तेच निघाले जुगारी
आश्चर्याची बाब म्हणजे, सेवानगर तांडा येथे जुगार खेळताना पकडलेल्या आरोपींमध्ये सकाळी पोलिसांना निवेदन देणारे सामाजिक कार्यकर्ते रोहित राजेंद्र चव्हाण आणि आकाश दिलीप राठोड यांचाही समावेश होता. निवेदन दिल्यानंतर १२ तास उलटण्याच्या आतच ते स्वतःच जुगार खेळताना सापडल्याने त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर परिसरातून तीव्र टीका होत आहे.
या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी . सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.