बेंबळी – शेतजमिनीच्या जुन्या वादातून एका व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत लोखंडी रॉड, खोरे आणि कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बेंबळी शिवारात घडली.
याप्रकरणी अब्बास सय्यद अली शेख (वय २९, रा. बेंबळी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्बास शेख, त्यांचे आई आणि भाऊ बेंबळी शिवारातील त्यांच्या शेतात असताना, आरोपी वसीम अहेमद शेख, अमर उर्फ मुन्ना अहेमद शेख, अहेमद इक्रोमोद्दीन शेख आणि सुफिया अहेमद शेख (सर्व रा. बेंबळी) यांनी संगनमत करून त्यांना गाठले.
आरोपींनी जुन्या शेतीच्या वादाचे कारण काढून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, खोरे आणि कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, “तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर अब्बास शेख यांनी ११ ऑगस्ट रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वसीम शेख, अमर उर्फ मुन्ना शेख, अहेमद शेख आणि सुफिया शेख यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी अधिक तपास बेंबळी पोलीस करत आहेत.