उमरगा – “पुढे रस्त्यावर गडबड सुरू आहे, तुमच्या अंगावरचे दागिने काढून ठेवा,” असे सांगून पोलीस असल्याची बतावणी करत दोन अनोळखी इसमांनी एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याची घटना उमरगा तालुक्यात घडली आहे. चोरट्यांनी फिर्यादीची सोन्याची चैन आणि अंगठी असा एकूण ६६,५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
याप्रकरणी देविदास गोपाळराव गायकवाड (वय ७०, रा. चिंचोली भुयार, ता. उमरगा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास गायकवाड हे ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ ते ११:३० च्या सुमारास आपल्या मोटरसायकलवरून जात होते. ते बलसूर पाटीजवळ आले असता, पाठीमागून एका मोटरसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना थांबवले.
“आम्ही पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी आहोत, पुढे रस्त्यावर गडबड सुरू आहे. तुम्ही तुमच्या अंगावरील सोन्याची चैन आणि अंगठी काढून खिशात ठेवा,” असे त्यांनी गायकवाड यांना सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गायकवाड यांनी आपली सोन्याची चैन आणि अंगठी काढली. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी हातचलाखीने दागिने लंपास केले आणि तेथून पसार झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देविदास गायकवाड यांनी १२ ऑगस्ट रोजी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१९ (२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, तोतया पोलिसांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.