धाराशिव: तालुक्यातील करजखेडा येथील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांच्या आत अटक केली आहे. जुन्या वादातून पती-पत्नीची निर्घृण हत्या करून फरार झालेले आरोपी जिवन हरीबा चव्हाण आणि हरीबा यशवंत चव्हाण यांना पुणे येथे नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांची शिताफीची कारवाई
प्रभारी पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली बेंबळी पोलीस ठाण्यातील या संवेदनशील गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली होती. गोपनीय खबऱ्याकडून आरोपी पुण्यातील नातेवाईकाकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने पुण्याला रवाना झाले.
पुण्यातील जनता वसाहत, पर्वती पायथा येथील एका घरात आरोपी लपले असल्याची खात्री होताच, पथकाने अत्यंत शिताफीने दोघांनाही ताब्यात घेतले. अटकेनंतर त्यांना धाराशिव येथे आणून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी बेंबळी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
हत्येची पार्श्वभूमी
मृत सहदेव पवार आणि आरोपी हरीबा चव्हाण यांच्यात गेल्या चार वर्षांपासून शेतीच्या बांधावरून वाद होता. याच वादातून सहदेव पवार यांनी हरीबा चव्हाण यांची बोटे छाटली होती. या गुन्ह्यात तुरुंगात असलेला सहदेव नुकताच जामिनावर बाहेर आला होता. याच रागातून आरोपी पिता-पुत्राने सहदेव आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार यांची गाडीने धडक देऊन व नंतर कोयत्याने वार करून हत्या केली होती. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते.
धाराशिव दुहेरी हत्याकांड: चार वर्षांपूर्वीच्या वादातून रक्तरंजित बदला; संशयित पिता-पुत्र फरार
करजखेडा दुहेरी हत्याकांड : सूडाचे भयाण वास्तव आणि कायद्याचा वचक