धाराशिव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या आणि मालमत्तेच्या प्रचंड नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, अशी जोरदार मागणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील अनेक महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये धाराशिव, कळंब, तुळजापूर, भूम आणि वाशी तालुक्यांतील अनेक गावांचा समावेश आहे. विशेषतः कळंब तालुक्यात सरासरी १३६.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, ढोकी, तेर, गोविंदपूर येथे १६८.५ मिमी, तर कळंब आणि इटकुर मंडळात १६४.५ मिमी पावसाने थैमान घातले आहे.
या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन, उडीद, मूग, तूर यांसारखी हाता-तोंडाशी आलेली पिके पूर्णपणे बाधित झाली आहेत. पिकांची वाढ खुंटली असून, मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली आहे. सोयाबीन पिकावर मूळकुज, मानकुज आणि शेंगकरपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पीक वरून हिरवेगार दिसत असले तरी उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट येणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले.
पिकांच्या नुकसानीबरोबरच, पुराच्या पाण्यामुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत, नदीपात्र बदलले आहे, अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी घरांची पडझड होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे.
एवढे मोठे नुकसान होऊनही प्रशासनाने अद्याप पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नाहीत, यावर आमदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून सर्व महसुली मंडळांमधील नुकसानीचे पंचनामे करावेत आणि त्याचा अहवाल शासनास सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.