मागील भागात आपण पाहिले: बळीराजाच्या जलसमाधीवर पिंट्याने ‘जल-आनंदोत्सवाचा’ फेसबुक लाईव्ह केला होता. आता विकासाचे पाणी मुंबईपर्यंत पोहोचले होते…
फेसबुक पिंट्याच्या राजकीय कारकिर्दीत ‘वाद’ हा शब्द इतका सहज मिसळून गेला होता की, जर एखाद्या आठवड्यात काहीच वाद झाला नाही, तर “भाऊंची तब्येत ठीक आहे का?” अशी विचारणा व्हायची. तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय असाच होता. पिंट्याने मुंबईत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीचे फोटो फेसबुकवर टाकले. फोटोत सगळेजण असे काही गंभीर आणि उत्साही दिसत होते, जणू मंदिराच्या जीर्णोद्धाराचा नाही, तर थेट मंगळावर मंदिराच्या नव्या शाखेचा प्लॅन ठरत होता.
पिंट्याची पोस्ट होती: “ऐतिहासिक क्षण! मुंबईत माननीय मंत्री महोदयांसोबत आई भवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धारावर अत्यंत सकारात्मक आणि एकोप्याने चर्चा झाली. विकासाच्या या सुवर्ण अध्यायात सर्वांचे सहकार्य लाभत आहे, याचा आनंद आहे. #VikasachaMahameru #TuljapurRising”
पिंट्याच्या फेसबुकी विश्वात सगळं आलबेल होतं, पण वास्तव्याच्या जगात मात्र या ‘ऐतिहासिक’ बैठकीचे तीन-तेरा वाजले होते.
गोंधळ क्रमांक १: ‘अतिथी देवो भव:’… पण फक्त आमच्याच!
या ‘सर्वांच्या सहकार्याने’ पार पडलेल्या बैठकीची निमंत्रण पत्रिका बहुतेक ‘आमच्याच माणसांपुरती मर्यादित’ होती. कारण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर, या दोघांनाही या ‘ऐतिहासिक क्षणाचे’ साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं नव्हतं. त्यांना साधे ‘व्हॉट्सॲप’वर आमंत्रणही आले नव्हते. मंदिराचा प्रश्न जिल्ह्याच्या अस्मितेचा होता, पण जिल्ह्याचा ‘माय-बाप’ पालकमंत्री आणि जनतेचा आवाज खासदारच ‘अनइन्व्हाइटेड’ होते. यावरून चर्चा सुरू झाली की, हा जीर्णोद्धार आहे की ‘घरगुती कार्यक्रम’?
गोंधळ क्रमांक २: बैठकीत ‘मटका किंग’ची वर्णी!
एकीकडे लोकप्रतिनिधींना ‘गेट-आउट’चा बोर्ड दाखवला जात होता, तर दुसरीकडे एका ‘खास’ व्यक्तीसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरले होते. ही व्यक्ती होती – ‘आकड्यांचा बादशाह’ अर्थात आपला मन्या ‘मटका किंग’! मंदिराच्या जतन-संवर्धनासारख्या पवित्र बैठकीत मन्या असा काही आत्मविश्वासाने बसला होता, जणू तोच मंदिराचा ‘वास्तुसल्लागार’ होता. त्याचा व्हिडिओ बाहेर येताच खळबळ माजली.
एका जाणकाराने सांगितले, “अहो, आधीच्या सत्काराला पिटू ‘ड्रग्ज माफिया’ होता, त्यामुळे पक्षश्रेष्ठी नाराज झाले. म्हणून आता पिंट्या भाऊंनी डोकं लावलंय. पिटूला बॅकस्टेज ठेवून त्याचा राईट हॅन्ड मन्याला पुढे केलंय. शहराच्या स्वच्छतेचं टेंडर, पार्किंगचा ठेका आणि आता थेट मंदिराच्या बैठकीत… मन्याचा ‘ओपनिंग रेट’ सध्या जोरदार चालू आहे!”
गोंधळ क्रमांक ३: ‘रिपोर्ट-रिपोर्ट’ खेळाचा नवा सीझन!
बैठकीत जीर्णोद्धाराच्या नावाखाली मंदिराचा काही भाग पाडून नवीन बांधण्याचा घाट घातला जात असल्याची कुजबुज सुरू होतीच. पण त्यापेक्षा मोठा विनोद होता अहवालाचा. साठ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ‘१५ दिवसांत अहवाल द्या’ असा आदेश दिला होता. तो अहवाल आजतागायत ‘ट्रॅफिकमध्ये अडकला’ होता. आता कालच्या बैठकीत, जुन्या अहवालाला श्रद्धांजली वाहत, ‘३० दिवसांत नवा कोरा अहवाल द्या’ असा नवा आदेश दिला.
एका पत्रकाराने यावर मस्त टिप्पणी केली – “हे सरकार नाही, ‘तारीख पे तारीख’ देणारा सिनेमा आहे. फक्त इथे सनी देओल नाही, फेसबुक पिंट्या आहे!”
या सगळ्या गोंधळात, पिंट्या मात्र आपल्या मुंबईच्या बैठकीच्या पोस्टवर आलेल्या ‘ग्रेट वर्क भाऊ’, ‘तुमच्यासारखा नेता नाही’, ‘धाराशिवचे भाग्यविधाते’ अशा कमेंट्स वाचून खुश होत होता. त्याने पिटूला फोन लावला.
“पिटू, बघितलंस का? मुंबईत आपलं वजन! लोकप्रतिनिधींपेक्षा आपल्या मन्याला जास्त महत्त्व मिळालं. याला म्हणतात ‘मास्टरस्ट्रोक’!”
पलीकडून पिटूचा घाबराघुबरा आवाज आला, “भाऊ, मास्टरस्ट्रोक राहू दे, मन्याचा व्हिडिओ लीक झालाय, आता आपल्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ होणार! तुम्ही फेसबुक बंद करा आधी!”
…पण तोपर्यंत उशीर झाला होता.
पुढील भागात भेटूया…
– बोरूबहाद्दर