धाराशिव- तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण आणि अवैध धंद्यांविरोधात वृत्तमालिका प्रकाशित करणे ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना महागात पडल्याचे चित्र आहे. एका गुन्ह्याच्या चौकशीच्या नोटीसवरून तुळजापूरचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी आज सकाळी श्री. ढेपे यांना थेट पुण्यात येऊन अटक करण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ढेपे यांनी पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना तुळजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याप्रकरणी (गु.र.क्र. १८९/२०२५) साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यासाठी २० ऑगस्ट रोजी एक नोटीस बजावण्यात आली होती. नोकरीनिमित्त पुण्यात राहत असल्याने आणि सदर प्रकरणाची कोणतीही माहिती नसल्याने आपण हजर राहू शकत नाही, असे उत्तर ढेपे यांनी पोलिसांना दिले होते.
या उत्तराने समाधान न झाल्याने, आज सकाळी १०:३५ वाजता पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी ढेपे यांना व्हाट्सॲपवर फोन करून, “नोटीसचा जबाब देण्यासाठी तुळजापूरला ये, नाहीतर उद्या पुण्यात पोलीस पाठवून तुला अटक करेन,” अशी थेट धमकी दिली.
धमकीमागे बातम्यांचा राग?
‘धाराशिव लाइव्ह’ने मागील काही दिवसांपासून तुळजापूर परिसरात वाढलेले ड्रग्जचे जाळे आणि इतर अवैध धंद्यांवर निर्भीडपणे बातम्यांची मालिका चालवली होती. या वृत्तांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच वृत्तांच्या रागातून, जुन्या गुन्ह्यात साक्षीदार म्हणून नोटीस पाठवून आणि आता अटकेची धमकी देऊन आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संपादक सुनील ढेपे यांनी केला आहे.
ढेपे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराला अशा प्रकारे धमकी देणे हे सत्तेचा दुरुपयोग आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.”
या घटनेमुळे जिल्ह्यातील पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.