धाराशिव : धाराशिव शहरातील गावसुद रोडवरील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, मोटरसायकल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ४२ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शफकत अमाना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आज, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एसडीपीओ कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल अनिल मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी शाहिद सलाउद्दीन शेख (रा. धाराशिव) व इतर सात जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा क्रमांक १७५/२५ नुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ‘तिरट’ नावाच्या जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटरसायकली जप्त केल्या आहेत.
या यशस्वी कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकातील पोह/हुसेन, गरड, पोना/पाटील, पोअं/अनिल, ठाकूर, गरड आणि चापोह/लाटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे शहरातील अवैध धंद्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.