धाराशिव: शासनाने बंदी घातलेल्या ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून जास्त पैसे कमावण्याचे अमिष दाखवून तुळजापूर येथील एका पिता-पुत्राची तब्बल १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धाराशिव येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांक धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ येथील रहिवासी असलेले कालिदास लिंबाजी गवळी (वय ५४) यांचा मुलगा कृष्णा याला अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. जास्त पैसे कमावण्याचे अमिष दाखवत, आरोपींनी शासनाची बंदी असलेल्या ऑनलाइन गेमसाठी ‘exchange.com’ नावाची एक लिंक तयार केली. ही लिंक विविध व्हॉट्सॲप क्रमांकांवरून कृष्णा याला पाठवण्यात आली.
या बनावट गेमच्या जाळ्यात अडकून कालिदास गवळी आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांनी वेळोवेळी मोठी रक्कम गुंतवली. आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून संपर्क साधून त्यांच्याकडून एकूण १६,८५,४९८ रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कालिदास गवळी यांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या तक्रारीवरून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३५६ (२) आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑनलाइन गेमिंग आणि झटपट पैसे कमावण्याच्या अमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.