धाराशिव: तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ६०९५ बोगस मतदार नोंदणी प्रकरणी गुन्हा दाखल होऊन दहा महिने उलटले तरी तपासात कोणतीही प्रगती झाली नसल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात मोठे षडयंत्र असून अनेक मोठे नेते अडकण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. कुलदिप (धिरज) कदम-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
ॲड. कदम-पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, धाराशिव यांना २४ ऑगस्ट २०२५ रोजी एक पत्र दिले आहे. या पत्रानुसार, १७ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी २४१-तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ६०९५ बोगस मतदार नोंदणी करण्याविरोधात फिर्याद (FIR) दाखल केली होती. मात्र, दहा महिने उलटूनही तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अशी उघडकीस आली बोगस नोंदणी:
- काँग्रेसचे सरपंच संजय वाघोले (हंगरगा नळ) आणि बी.एल.ओ. (BLO) श्री. गिरी यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर ॲड. कदम-पाटील यांनी स्वतः तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याशी संपर्क साधला.
- त्यानंतर, हंगरगा नळ येथील ग्रामस्थांच्या वतीने ॲड. जयंत शिवाजी इंगळे यांनी १६ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.
- काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि बी.एल.ए. (BLA) यांनी मतदार याद्या तपासल्यानंतर जवळपास ६००० हून अधिक नावे बोगस पद्धतीने नोंदवल्याचे समोर आले.
नोंदणीसाठी वापरलेली धक्कादायक पद्धत:
या बोगस नोंदणी रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- नाव नोंदणी प्रक्रियेत फोटो एकच, मात्र नाव आणि आधार क्रमांक वेगवेगळे वापरण्यात आले आहेत.
- ‘एनरोल नामाकंन नंबर’ ४८९२/८९६५९/४१४ हा एकच क्रमांक हजारो आधार क्रमांकांसाठी वापरला गेला आहे.
- नोंदणीसाठी वापरलेले आधार क्रमांक अस्तित्वात नाहीत आणि सर्व बनावट आधार कार्डवर २३ मे २०१९ ही एकच तारीख आहे.
- २ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’च्या माध्यमातून अर्ज क्रमांक ६ भरून ही नावे नोंदवण्यात आली होती.
या प्रकरणात मोठे षडयंत्र असून अनेक मोठे नेते आणि व्यक्ती यात अडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई करावी, अशी विनंती ॲड. कदम-पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.