धाराशिव – ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच ‘बघून घेऊ’ अशी धमकी दिल्याप्रकरणी आनंद कंदले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील पत्रकार एकवटले आहेत. पत्रकारांवर होणारी दडपशाही, अन्याय आणि खोट्या कारवायांच्या विरोधात पत्रकार संघटनांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
मागील काही काळापासून जिल्ह्यात सत्य आणि वास्तव मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य केले जात आहे. तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणासह इतर अनेक अवैध धंद्यांवर बातमीदारी केल्यामुळे पत्रकारांना धमक्यांचे प्रकार वाढले आहेत. ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना तुळजापूरचे पोलीस निरीक्षक मांजरेंनी धमकावले होते. यानंतर, आनंद कंदले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच ढेपे यांना “आमच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला तर काय होईल,” असे म्हणत धमकी दिली,
या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर अशा प्रकारे दबाव आणला जात असेल, तर पत्रकार निर्भीडपणे काम कसे करणार? हा लोकशाहीवर हल्ला आहे. काही दिवसांपूर्वी भूमचे पत्रकार चंद्रमणी गायकवाड यांनी अवैध धंद्यांवर प्रश्न विचारला असता, त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत एनसी दाखल करण्यात आली. हा केवळ आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे.
पत्रकारांच्या प्रमुख मागण्या:
- ‘धाराशिव लाइव्ह’च्या संपादकांना धमकावणारे आनंद कंदले यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.
- पत्रकारांवर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांची सखोल चौकशी व्हावी.
- वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना सुरक्षा पुरवण्यात यावी.
- राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
यावेळी हुंकार बनसोडे, राजाभाऊ वैद्य, संतोष जाधव, बालाजी निरफळ, रहीम शेख, चंद्रसेन देशमुख, सयाजी शेळके, महेश पोतदार, शीला उंबरे, आकाश नरोटे, जुबेर शेख, किरण कांबळे, आतिक सय्यद, युसुफ मुल्ला, वैभव पारवे, सुभाष कदम, किशोर माळी, आयुब शेख, मुस्तफा पठाण, प्रमोद राऊत, कलीम शेख, पांडुरंग मते, मल्लिकार्जुन सोनवणे, अमजद सय्यद, गणेश जाधव, संतोष शेटे, कुंदन शिंदे, राकेश कुलकर्णी, विशाल जगदाळे, जब्बार शेख, कलीम सय्यद, सुरेश चव्हाण आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.