सत्तेच्या सावलीत पोसलेली गुंडगिरी जेव्हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला करते, तेव्हा समजून जावं की शहरात कायद्याचं नाही, तर मस्तवाल झुंडशाहीचं राज्य आलं आहे. धाराशिवमध्ये सध्या हाच नंगानाच सुरू आहे. ज्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहायचं, त्याच दारात ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना “आमच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला तर काय होईल,” अशी थेट धमकी दिली जाते. ही धमकी एका पत्रकाराला नाही, तर तुमच्या-आमच्या आवाजाला आहे. ही धमकी त्या निर्भीड पत्रकारितेला आहे, जी गेली १४ वर्षे भ्रष्टाचाराची लक्तरं वेशीवर टांगत आहे.
हे भाडोत्री तट्टू कोणाच्या इशाऱ्यावर नाचत आहेत, हे धाराशिवच्या जनतेला वेगळं सांगायची गरज नाही. जेव्हा तुळजापूरच्या ड्रग्स रॅकेटवर किंवा जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर लेखणी चालते, तेव्हा यांच्या राजकीय मालकांच्या पायाखालची वाळू सरकते. मग सुरू होतो धमक्यांचा, सोशल मीडियावर चारित्र्यहननाचा आणि खोट्या तक्रारींचा खेळ. यांना वाटतं की, पोलिसांना हाताशी धरून, ‘सरकारी कामात अडथळा’ नावाचं तकलादू कलम लावून पत्रकाराचा आवाज दाबून टाकता येईल. भूमचे पत्रकार चंद्रमणी गायकवाड यांच्यासोबत जे घडलं, ते याच मस्तवाल मानसिकतेचं प्रतीक आहे. प्रश्न विचारणाऱ्यालाच गुन्हेगार ठरवण्याचा हा खेळ आता फार काळ चालणार नाही.
कालपर्यंत जे पत्रकार वेगवेगळ्या विषयांवर लिहीत होते, ते आज एकाच आवाजात बोलत आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेलं निवेदन हे केवळ एक कागदपत्र नाही, तर गुंडगिरीच्या छाताडावर ठेवलेलं पहिलं पाऊल आहे. ‘आनंद कंदलेवर कारवाई करा’ ही मागणी केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तर ती अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठीचा हुंकार आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा, ही मागणी स्वतःच्या सुरक्षेसाठी नाही, तर लोकशाहीच्या सुरक्षेसाठी आहे.
ज्यांना वाटत असेल की धमक्या देऊन, खोटे गुन्हे दाखल करून किंवा ट्रोल करून ही लेखणी थांबेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. ही धाराशिवची पत्रकारिता आहे; संघर्षाच्या आगीत तावूनसुलाखून निघालेली. तुम्ही एक आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल, तर शंभर आवाज बुलंद होतील. तुम्ही एकावर खोटा गुन्हा दाखल कराल, तर अख्खी पत्रकारिता तुमच्या भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन रस्त्यावर उतरेल.
त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आणि त्यांच्या भाडोत्री गुंडांनी एक गोष्ट कायमची लक्षात ठेवावी – पत्रकारिता जिंकली आहे आणि तुमची गुंडगिरी हरली आहे. हा फक्त ट्रेलर आहे, खरा सिनेमा अजून बाकी आहे. लेखणी मोडली तरी तिची शाई रस्त्यावर उतरून तुमचा काळा चेहरा जगासमोर आणल्याशिवाय राहणार नाही!
-सुनील ढेपे,संपादक, धाराशिव लाइव्ह