तुळजापूर: बनावट कागदपत्रे आणि खोटे शपथपत्र तयार करून सिटी सर्व्हेचा प्लॉट हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन सख्ख्या भावांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल १२ वर्षे हा प्रकार सुरू असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
याप्रकरणी सोमनाथ दादाराव डाके (वय ६५, रा. तांबरी विभाग, बार्शी नाका, धाराशिव) यांनी मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी सुनिल मारुती डाके आणि शिवा मारुती डाके (दोघे रा. लालबहादुर शास्त्री नगर, वडार गल्ली, तुळजापूर) यांनी संगनमत करून फसवणूक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ५ मार्च २०१० ते ९ ऑगस्ट २०२२ या कालावधीत तुळजापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात फिर्यादी सोमनाथ डाके यांच्या नावाचे खोटे शपथपत्र तयार केले. या बनावट शपथपत्राचा गैरवापर करून त्यांनी तुळजापूर शहरातील लालबहादुर शास्त्री नगर येथील सिटी प्लॉट क्रमांक १८१ (सिटी सर्व्हे क्रमांक ३८४२) बाबतची खोटी कागदपत्रे तयार केली आणि ती खरी असल्याचे भासवून फिर्यादीची फसवणूक केली.
या प्रदीर्घ काळ चाललेल्या फसवणुकीच्या प्रकारानंतर अखेर सोमनाथ डाके यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांनी आरोपी सुनिल डाके व शिवा डाके यांच्याविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४६८ (फसवणुकीसाठी बनावट दस्तऐवज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे) आणि ३४ (समान उद्देश) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.