मंडळी, गोष्ट आहे एका वाघाची… पण थांबा! हा साधासुधा वाघ नाही, हा आहे ‘टुरिस्ट वाघोबा’! यवतमाळच्या टिपेश्वर जंगलात या पठ्ठ्याला बहुधा कंटाळा आला असावा. “रोज तेच जंगल, तेच हरीण… काहीतरी चेंज पाहिजे,” असा विचार करून स्वारीने थेट ५०० किलोमीटरची सोलो ट्रिप काढली आणि थेट आपल्या धाराशिव जिल्ह्यात लँडिंग केली. तो दिवस होता २२ डिसेंबर. तेव्हापासून गेली आठ महिने झाले, हा वाघ नाही, जणू जिल्ह्याचा जावईच बनून राहिला आहे!
आल्या आल्या वाघोबाने जिल्ह्याचा नकाशा उघडला. “व्वा! काय छान मेन्यू आहे!” म्हणत त्याने १०० पेक्षा जास्त जनावरांवर असा काही ताव मारला की, जणू तो ‘झोमॅटो’चा फूड क्रिटिकच आहे. धाराशिवची मिसळ तर फेमस आहेच, पण इथली ‘लाईव्ह स्टॉक’ डिश त्याला जास्तच आवडलेली दिसते.
आता एवढा मोठा ‘VVIP’ पाहुणा आल्यावर वन विभागाची धांदल उडणारच! सुरुवातीला थेट ताडोबाच्या जंगलातून एक स्पेशालिस्ट टीम आली. बंदुका, जाळ्या, कॅमेरे घेऊन २५ दिवस त्यांनी अशी काही जंगल सफारी केली की विचारता सोय नाही. पण आमचा वाघोबा? तो कुठेतरी झाडामागे बसून त्यांची मजा बघत असेल. “अरे, मी इथे आहे!” असं मनात म्हणत तो दुसऱ्याच गावात निघून गेला. ताडोबाची टीम रिकाम्या हाताने परत गेली.
मग काय, पुण्याची ‘हाय-टेक’ टीम पाचारण करण्यात आली. ड्रोन, सेन्सर, जीपीएस… सगळा जामानिमा सोबत होता. एक महिनाभर त्यांनी ‘शोध घेतो वाघाचा’ नावाचा कार्यक्रम राबवला. पण वाघोबा त्यांच्या तंत्रज्ञानापेक्षा दोन पावलं पुढे होता. तो ‘आज येथे, उद्या तेथे’ करत होता. आज येडशीच्या अभयारण्यात मेडिटेशन, तर उद्या बार्शीच्या शिवारात मॉर्निंग वॉक! कधी भूम तर कधी वाशी, जणू त्याची ‘महाराष्ट्र दर्शन’ यात्राच सुरू होती.
आणि आज, ४ सप्टेंबर! वाघोबांनी वरवंटी शिवारात शेतकऱ्यांना ‘स्पेशल दर्शन’ दिले. शेतकरी घाबरले, पण कुठेतरी त्यांनाही आता सवय झाली असावी. “आले का पाव्हणे?” असं म्हणत त्यांनी वन विभागाला फोन लावला. वन विभागाची गाडी सायरन वाजवत पोहोचतेय, तोपर्यंत पठ्ठ्याने कामठा, कात्री, आपसिंगा असा पुढचा दौरा सुरू केला होता.
वन विभागाचे कर्मचारी आता डायरीत रोज एकच नोंद करत असतील, “वाघोबा पुन्हा दिसले, आम्ही मागे पळालो, वाघ पुन्हा गायब!”
थोडक्यात काय, तर हा वाघ म्हणजे एक कोडं आहे. तो वन विभागासाठी डोकेदुखी आणि गावकऱ्यांसाठी ‘दिसला तर भीती, नाही दिसला तर चर्चा’ असा विषय बनला आहे. सध्या तरी ‘पकडा-पकडी’चा हा खेळ जोरदार सुरू आहे, ज्यात वाघोबा प्रत्येकवेळी जिंकतोय!