परंडा – “मोटरसायकल वेडीवाकडी का चालवतोस?” अशी विचारणा केल्याच्या क्षुल्लक कारणावरून परंडा बस आगारात एका एस.टी. चालकाला दोघांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी चालकाला जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत चंद्रकांत औताडे (वय ४२, रा. गोरमाळा, ता. भुम) असे मारहाण झालेल्या एस.टी. चालकाचे नाव आहे. ते परंडा डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी, दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते परंडा बस आगारात कर्तव्यावर होते. यावेळी आरोपी सोमनाथ मिस्कीन (रा. डोमगाव) व त्याचा एक साथीदार बुलेट मोटरसायकल वेडीवाकडी चालवत होते.
त्यावेळी चालक औताडे यांनी त्यांना “बुलेट वेडीवाकडी का चालवतो?” असे विचारले. याचा राग मनात धरून आरोपी सोमनाथ मिस्कीन व त्याच्या साथीदाराने औताडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.
या घटनेनंतर चालक प्रशांत औताडे यांनी तात्काळ परंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सोमनाथ मिस्कीन व त्याच्या एका साथीदारावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 121(2), 224, 351(2), 3(5) आणि 221 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी परंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.