मुरूम – “मुख्यमंत्री साहेब, बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटप्रमाणे अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्या,” अशी आर्त साद घालणारी चिट्ठी लिहून एका 3२ वर्षीय युवकाने आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना उमरगा तालुक्यातील नाईकनगर येथे घडली आहे. पवन गोपीचंद चव्हाण असे या युवकाचे नाव असून, या घटनेमुळे बंजारा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन चव्हाण हा बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अत्यंत सक्रिय होता. काही दिवसांपूर्वीच तो जालना जिल्ह्यातील जिंतूर येथे गोर समाजाचे अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तो सातत्याने जनजागृती करत होता. शुक्रवारीच जिंतूरहून आपल्या गावी नाईकनगरला परत आलेला पवन, शनिवारी सकाळी पुन्हा जिंतूरला आंदोलनासाठी जाणार होता. मात्र, तत्पूर्वीच त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी पवनच्या खिशात एक चिट्ठी सापडली, ज्यामध्ये त्याने मुख्यमंत्र्यांना उद्देशून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. या चिट्ठीमुळे घटनेला गंभीर वळण लागले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पवन चव्हाण याच्या या टोकाच्या पावलामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी रूपाली, तीन वर्षांचा मुलगा रुद्र, पाच वर्षांची मुलगी रितिका आणि आई द्रोपदाबाई असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण नाईकनगर आणि बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे.