परंडा – येथील मोमीन गल्लीत मालमत्तेच्या जुन्या वादातून एका ५२ वर्षीय व्यापाऱ्याला मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि रोख रक्कम हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मदशफी अन्वर हन्नुरे (वय ५२, रा. मोमीन गल्ली, परंडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना शनिवारी, २० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२:१५ च्या सुमारास घडली. हन्नुरे हे कामानिमित्त मुंबईला जाण्यासाठी तयारी करत असताना, घराबाहेर मोठा आवाज आल्याने ते बाहेर आले. त्यावेळी, महेदी रहिम हन्नुरे आणि त्याचा भाऊ फरिद रहिम हन्नुरे हे चाँदबी युनुस हन्नुरे आणि इशरत मुस्तफा हन्नुरे यांना शिवीगाळ करत, दगडाने व लोखंडी कटावणीने शटरचे कुलूप तोडत असल्याचे दिसले, असे फिर्यादीत म्हटले आहे. हन्नुरे यांनी सांगितले की, या जागेवरून दोन्ही भावांमध्ये गेल्या १८ वर्षांपासून न्यायालयात वाद सुरू आहे.
याबाबत जाब विचारला असता, “तुझा काय संबंध, मी तुझा काटा काढतो,” असे म्हणत महेदी हन्नुरे याने मोहम्मदशफी हन्नुरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत महेदीने त्यांच्या गळ्यातील अंदाजे ३५,००० रुपये किमतीची ११ ग्रॅमची सोन्याची साखळी ओढून घेतली आणि टिशर्टच्या खिशातील २०,००० रुपयांची रोकड काढून घेतली. तसेच, फरिद हन्नुरे यानेही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मोहम्मदहानिफ जब्बार हन्नुरे आणि सद्दाम कादर जिनेरी यांनी मध्यस्थी करून हे भांडण सोडवले.
हन्नुरे यांच्या तक्रारीवरून परंडा पोलिसांनी महेदी रहिम हन्नुरे आणि फरिद रहिम हन्नुरे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या 119( 1 ), 115 (2) , 352, 351 (2 ), 3 (5) कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विश्वनाथ शिवराम शिंदे करत आहेत.