धारशिव: तुळजापूर येथील शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. नळदुर्ग-तुळजापूर बायपास रस्त्यावर सापळा रचून पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी बीड जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तुळजापूर शहरात नवरात्रोत्सवानिमित्त गस्त घालत असताना, त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. या माहितीनुसार, नळदुर्ग-तुळजापूर बायपास रस्त्यावर एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये (क्र. एम.एच. ११ एके ९६२१) काही इसम दरोड्याच्या तयारीत थांबले होते. पथकाने तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन सायंकाळी ७:१५ वाजता त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच गाडीतील दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकाने त्यांना आणि गाडीतील इतर तिघांनाही जागेवरच पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली असता, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र, अधिक चौकशीनंतर त्यांनी आपली नावे सांगितली, जी खालीलप्रमाणे आहेत:
- रोहित ऊर्फ तात्या अंकुश गायकवाड (वय ३६, रा. सुभाष कॉलनी, बीड)
- अमर आसाराम गायकवाड (वय २३, रा. नळवंडी नाका, बीड)
- राजेश अभिमान जाधव (वय २७, रा. चऱ्हाटा, जि. बीड)
- राजाभाऊ ज्ञानदेव यादव (वय २५, रा. वांगी, जि. बीड)
- प्रशांत दिलीप डाके (वय २५, रा. स्वराज्य नगर, बीड)
- पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, यापैकी काही आरोपींवर दरोड्याची तयारी, खून आणि चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या गाडीची तपासणी केली असता, त्यात एक लोखंडी धारदार कोयता सापडला. या पाचही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे1 त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), ३१०(५) आणि शस्त्र अधिनियम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि . अमोल मोरे, सपोनि सचिन खटके आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.