धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात सोमवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि काही ठिकाणी निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या दूरध्वनी संदेशानुसार, मंगळवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, जिल्ह्यात २२ सप्टेंबर २०२५ पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागेश मापारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके यांनी दिलेल्या आदेशानुसार, ही सुट्टी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना लागू असेल.
सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील मुख्याध्यापकांना या निर्णयाची तात्काळ माहिती द्यावी, तसेच समाज माध्यमांद्वारे हा संदेश आजच पालकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.