नियती जेव्हा एखाद्या प्रदेशावर सूड उगवायला लागते, तेव्हा ती कुठल्या थराला जाऊ शकते याचं विदारक चित्र म्हणजे आजचा धाराशिव जिल्हा. ज्या मातीने आजवर फक्त पाण्यासाठी आभाळाकडे डोळे लावले, त्याच मातीला आज पाण्यानेच गिळंकृत केलं आहे. मराठवाड्याच्या नकाशावर कायम विकासाच्या बाबतीत मागे राहिलेला आणि देशातील मागास जिल्ह्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला हा जिल्हा आज अक्षरशः चिखलात रुतून बसला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये जिल्ह्यावर कोसळलेलं हे अस्मानी संकट म्हणजे केवळ एक नैसर्गिक आपत्ती नाही, तर इथल्या माणसाच्या सहनशीलतेचा घेतलेला अंत आहे.
धाराशिवचा इतिहास हा संघर्षाचा आणि त्यातून फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठण्याचा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तब्बल एक वर्ष पारतंत्र्यात, निजामाच्या जोखडात अडकलेल्या या भूमीने स्वातंत्र्यासाठी आपल्या अनेक सुपुत्रांचे बलिदान दिले आहे. तो घाव भरत नाही तोच, १९७२ च्या भीषण दुष्काळाने या प्रदेशाला होरपळून काढले. लोकांनी सुकडी, लाल ज्वारी (मिलो) आणि अंबाडी खाऊन दिवस काढले, पण ते जगले, पुन्हा उभे राहिले. त्यानंतर ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने तर होत्याचं नव्हतं केलं. सास्तूर, माकणी परिसरात मृत्यूने थैमान घातले, गावं जमिनीत गाडली गेली, पण त्या उद्ध्वस्त झालेल्या ढिगाऱ्यांवरही इथला माणूस तग धरून उभा राहिला. अगदी अलीकडे, २०२० ते २०२२ या काळात कोरोनाच्या महामारीने जिल्ह्यातून सुमारे १५०० जीव हिरावून नेले, जगणं थांबवलं, पण तरीही लोकांनी धीर सोडला नाही.
प्रत्येक संकटावर मात करत, प्रत्येक घाव सोसत धाराशिवची पोलादी छाती आजवर ताठ मानेने उभी राहिली. पण यावेळचा घाव वर्मी बसला आहे. ज्या जिल्ह्यात पावसाची नेहमीच प्रतीक्षा असते, तिथे ढगफुटी व्हावी, हा नियतीचा क्रूर विनोदच म्हणावा लागेल. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. अनेक दशकांपासून पाणी साठवून राहिलेले तलाव फुटले आणि त्यांनी थेट शेतांमध्येच आपलं नवीन पात्र शोधलं. हिरवीगार दिसणारी सोयाबीन, उडीद, उसाची शेती डोळ्यादेखत तळ्यात बदलली. आयुष्यभर जपलेल्या फळबागा उन्मळून पडल्या. शेतीचा जणू भूगोलच बदलून गेला.
कळंब, भूम, परंडा या तालुक्यांना बसलेला फटका तर वर्णनापलीकडचा आहे. ज्या गावात कधीतरी टँकरने पाणी यायचं, ती गावं पुराच्या पाण्याने वेढली गेली. सुमारे ५०० लोकांना जीव वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली, यावरून परिस्थितीच्या भीषणतेची कल्पना येते. या महाप्रलयात आतापर्यंत १० जणांनी आपला जीव गमावला आहे, तर शेकडो मुकी जनावरं वाहून गेली आहेत. सगळ्यात भयंकर म्हणजे, शेतातली सुपीक मातीच खरवडून गेली आहे. आता उरला आहे तो फक्त दगड-गोट्यांचा आणि चिखलाचा थर.
संकट ओसरल्यानंतर आता राजकीय पर्यटनाचे दौरे सुरू झाले आहेत आणि संपलेही आहेत. आश्वासनांची खैरात झाली, सहानुभूतीचे सोहळे पार पडले आणि आता तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या पदरात टाकली जात आहे. पण ही मदत म्हणजे समुद्रातल्या पाण्याला थेंबाने शोषून घेण्यासारखं आहे. ज्या शेतकऱ्याची जमीनच वाहून गेली, ज्याचं भांडवलच नष्ट झालं, तो या चार पैशांच्या मदतीने काय करणार? त्याच्यासमोरचा खरा प्रश्न हा आहे की, तो पुढची किमान पाच वर्षे तरी पुन्हा उभा राहील का? या प्रश्नाचं उत्तर आज कुणाकडेही नाही.
शेतकरी हतबल आहे, त्याची स्वप्नं चिखलात रुतली आहेत आणि भविष्य अंधारमय झालं आहे. अशावेळी, त्याला केवळ तात्पुरत्या मलमपट्टीची नाही, तर एका मोठ्या शस्त्रक्रियेची गरज आहे. त्याची आजची सर्वात मोठी आणि रास्त मागणी ‘सरसकट कर्जमुक्ती’ ही आहे. कारण जुनं कर्ज फेडण्याची ऐपत तर सोडाच, नव्याने उभं राहण्यासाठी त्याच्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही.
सरकारने आणि प्रशासनाने आता केवळ दौरे आणि घोषणांच्या पलीकडे जाऊन कृती करण्याची गरज आहे. ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर एका संपूर्ण पिढीला उद्ध्वस्त करणारी घटना आहे. त्यामुळे केवळ कर्जमुक्तीच नव्हे, तर ज्यांची जमीन खरवडून गेली आहे, ती शेती पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठी एक विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करायला हवं. धाराशिवच्या माणसाने आजवर प्रत्येक संकटाचा सामना केला आहे, पण यावेळचं संकट त्याच्या ताकदीच्या बाहेरचं आहे. त्याला आता आधाराची, खऱ्या मदतीची आणि धोरणात्मक साथीची गरज आहे. ही केवळ मदतीची नाही, तर धाराशिवच्या मातीला आणि माणसाला पुन्हा एकदा सन्मानाने उभे करण्याची वेळ आहे.
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह