वरुणराजाने यावर्षी धाराशिव जिल्ह्यावर अक्षरशः सूड उगवला होता. ढगफुटीने हाहाकार माजवला, गावेच्या गावे बेटांमध्ये बदलली आणि तलाव फुटल्याने उभी शेती डोळ्यांदेखत पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून वाढवलेले सोयाबीन आता त्याच पाण्यात कुजत पडले होते. हतबल शेतकरी आपल्या घराच्या, गुरांच्या आणि उद्ध्वस्त झालेल्या संसाराच्या काळजीने सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसला होता.
संकट मोठे होते, त्यामुळे भेटीही मोठ्या होत्या. ठाण्याचे दाढीवाले, बारामतीचे दादा आणि जिल्ह्याचे पालकत्व मिरवणारे सरसेनापती, या सर्वांनी आपापल्या आलिशान गाड्यांमधून आणि हेलिकॉप्टरमधून पूर पाहणीचे ‘राजकीय पर्यटन’ पूर्ण केले. आश्वासनांचे गठ्ठे फेकले गेले आणि ताफ्याच्या गाड्या निघून गेल्या.
या नेतेमंडळींच्या दौऱ्यांच्या गर्दीत, सूर्यराजे यांनी मात्र खरा नेता कसा असतो, हे दाखवून दिले. ते केवळ पाहणी करायला नाही, तर थेट पुराच्या पाण्यात उतरले. त्यांनी स्वतः लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले, अडकलेल्या जनावरांना बाहेर काढले. त्यांच्या या धाडसाची चर्चा महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर झाली.
ही बातमी पाहून पावशेरसिंहाच्या ‘ब्लँडर बँके’ला मात्र पोटशूळ उठला. सूर्यराजेंच्या शौर्याला टक्कर देण्यासाठी त्यांच्या पगारी नोकरांनी एक नामी शक्कल लढवली. त्यांनी पावशेरसिंहाचा एक जुना फोटो उचलला, त्याला फोटोशॉपमध्ये चिखलात उभे केले आणि फेसबुकवर टाकून उदो-उदो सुरू केला. पण जनतेने हा ‘फोटोशॉपचा पराक्रम’ एका मिनिटात ओळखला आणि तेव्हापासून पावशेरसिंहांना एक नवीन नाव मिळाले – ‘फेसबुक पिंट्या’!
फेसबुक पिंट्याचा ‘लाईव्ह’ तमाशा
खऱ्या मदतीऐवजी फेसबुकवर कौतुक थापणाऱ्या या ‘पिंट्या’ने अखेर आपला ‘पर्यटन दौरा’ सुरू केला. आलिशान गाडीतून ते एका पूरग्रस्त गावात पोहोचले. तिथे एका शेतकऱ्याच्या शेताला तलावाचे स्वरूप आले होते. ‘फेसबुक पिंट्या’ने आपल्यातला दिग्दर्शक जागा केला.
त्यांनी तीन-चार गरीब शेतकऱ्यांना बोलावले आणि त्या गुडघाभर पाण्यात उभे राहण्यास सांगितले. स्वतः मात्र कडक इस्त्रीचे कपडे घालून, महागडे बूट सांभाळत पाण्याच्या बाहेर कोरड्या जागी उभे राहिले. त्यांच्या चमच्याने मोबाईल काढला आणि फेसबुक लाईव्ह सुरू झाले.
पिंट्या: (कॅमेऱ्याकडे पाहून) “नमस्कार बांधवांनो, मी आज पूरग्रस्त भागाच्या पाहणीवर आहे. हे बघा, हे तळे नाही, हे आपल्या शेतकऱ्याच्या शेतात साचलेले पाणी आहे.”
त्यांनी पाण्यात उभ्या असलेल्या एका शेतकऱ्याकडे बोट दाखवले.
पिंट्या: “दादा, खाली काय आहे?”
शेतकरी: (मनातल्या मनात शिव्या घालत) “…सोयाबीन.”
पिंट्या: (नाटकीय चेहऱ्याने) “विचार करा! सोयाबीन! बघा, किती नुकसान झाले आहे. आता तुमच्या मागे काय आहे?”
शेतकरी: (पुन्हा मनातल्या मनात शिव्या देत) “…ऊस.”
पिंट्या: “पीक विमा भरला आहे का?”
शेतकरी: (हतबलतेने) “नाही.”
पिंट्या: (मोठ्या अविर्भावात) “ठीक आहे. आता तुम्हाला काय करावे लागेल, हे मी तुम्हाला नंतर सविस्तर सांगतो. काळजी करू नका.”
फेसबुक लाईव्ह बंद झाले. घोषणा झाली, पण मदत कवडीचीही मिळाली नाही. शेतकऱ्यांना पाण्यात उभे करून केलेला हा ‘लाईव्ह’ तमाशा मात्र जगभर पोहोचला.
‘क्रॉप कटिंग’चा शिलालेख
या लाईव्ह तमाशानंतर, ‘फेसबुक पिंट्या’ यांनी आपल्या ‘विमा स्पेशालिस्ट’ प्रतिमेला जागत एक ‘जाहीर सल्ला’ फेसबुकवर लिहिला:
“ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यात आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात विमा मिळू शकतो. सर्वांनी आपापल्या शेतात ‘पीक कापणी प्रयोग’ करून घ्यावा.”
हा सल्ला वाचून शेतकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला. एक तरुण शेतकरी म्हणाला, “अरे, जिथे पीकच शिल्लक नाही, सगळं कुजून गेलंय, तिथे ह्यांना कापणीचा प्रयोग करायचा आहे! हा काय डोक्यावर पडलाय का?”
दुसरा म्हातारा शेतकरी उपहासाने म्हणाला, “त्या पिंट्याला सांगा, त्याचा हा सल्ला म्हणजे काय दगडावर कोरलेला ‘शिलालेख’ आहे का, जो आम्ही पाळलाच पाहिजे? आधी त्याला सांगा, चिखलात पीक नाही, आमचं नशीब कापलं गेलंय!”
बोरूबहाद्दरने यावर फक्त एकच मथळा दिला:
“फेसबुक पिंट्याचा ‘क्रॉप कटिंग’चा अजब सल्ला: आधी पाण्यात बुडवले, आता कागदावर कापायला सांगतात!”
पावशेरसिंहांनी नैसर्गिक आपत्तीलाही आपल्या आत्मप्रौढी आणि मूर्खपणाच्या प्रदर्शनाची संधी बनवले होते, आणि जनता ते उघड्या डोळ्यांनी पाहत होती.
…हे पाहूया पुढच्या भागात.