धाराशिव – शहरातील एका म्युच्युअल फंड वितरकाला अज्ञात सायबर चोरांनी तब्बल ४ लाख १ हजार ६८२ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादीच्या परस्पर त्यांच्या क्रेडिट कार्ड्सचा वापर करून फ्लिपकार्टवरून खरेदी करण्यात आली आणि या वस्तू बिहारमधील पाटणा येथील पत्त्यावर मागवण्यात आल्या.
याप्रकरणी खंडेराव रघुनाथ कवडे (वय ४३, रा. दत्तनगर, धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात तिघा अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडेराव कवडे हे म्युच्युअल फंड वितरक आणि विमा सल्लागार म्हणून काम करतात. अज्ञात आरोपींनी त्यांचे एसबीआय, आयसीआयसीआय, ॲक्सिस आणि ए.यु. बँकेच्या क्रेडिट कार्ड्सची माहिती मिळवली. त्यानंतर आरोपी संतोष (मो. ७२८२०५१४४८), सुमित (मो. ८७९८५०८३७०) आणि अशोक शर्मा (मो. ७७३९४२९३२४) यांनी कवडे यांच्या परवानगीशिवाय या क्रेडिट कार्ड्सवरून एकूण ४,०१,६८२ रुपयांची ऑनलाईन खरेदी केली.
विशेष म्हणजे, ही सर्व खरेदी फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवरून करण्यात आली आणि खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी पाटणा येथील ‘संतोष एसबीआय एटीएम, केला मंडी, बहादूरपूर’ आणि ‘संदलपुर गार्डन’ या पत्त्यांवर मागवण्यात आली.
आपल्या क्रेडिट कार्डवरून परस्पर व्यवहार झाल्याचे लक्षात येताच कवडे यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी) व (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपींच्या मोबाईल क्रमांकाच्या आणि डिलिव्हरीच्या पत्त्याच्या आधारे अधिक तपास करत आहेत.