कळंब : बनावट चेक आणि खोट्या NEFT पावतीच्या आधारे एका ६४ वर्षीय वृद्धाची फसवणूक केल्याचा प्रकार कळंब शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे येथील एका तरुणाविरोधात कळंब पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनुमंत दत्तात्रय जाधव (वय ६४, रा. मस्सा खं, ता. कळंब) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अभिजीत मोहन घोरपडे (रा. निमसाखर, पुणे) याने दि. १५ सप्टेंबर ते दि. १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही फसवणूक केली. कळंब-येरमाळा रस्त्यावर असलेल्या महावितरण (MSEDCL) कार्यालयासमोर आरोपीने जाधव यांना गाठले.
आरोपी अभिजीत घोरपडे याने फिर्यादी हनुमंत जाधव यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना एक बनावट चेक आणि बनावट NEFT पेमेंट केल्याची पावती दाखवली आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जाधव यांनी दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अभिजीत घोरपडे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि ३२२ अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. कळंब पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.