धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. लोकसंख्येचे प्रमाण आणि मागील आरक्षणाची नोंद घेत, शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ही सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षणामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलली असून, सभापती निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.
आज सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रारंभी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आठही तालुक्यांमधील मागील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण वाचून दाखवले. त्यानंतर, धाराशिव शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या शेख मारिया इस्माईल व शेख इकरा रईस या विद्यार्थिनींच्या हस्ते चिठ्ठ्यांद्वारे आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
या सोडतीनंतर जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांचे सभापतीपदाचे आरक्षण निश्चित झाले आहे, जे खालीलप्रमाणे:
तालुका निहाय सभापती आरक्षण:
- अनुसूचित जाती (पुरुष): उमरगा
- सर्वसाधारण महिला: धाराशिव, कळंब, परंडा
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला: वाशी
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी): लोहारा
- सर्वसाधारण (खुला): भूम, तुळजापूर
या सोडतीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सभापतीपद पटकावण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू होणार आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके व अनंत कुंभार, निवडणूक नायब तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह विविध अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.