आंबी – चिंचपूर-लंगोटवाडी रस्त्यावर अवैधपणे वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आंबी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी वाळूसह सुमारे ४ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन आण्णा भांड (वय २९, रा. दहिटणा, ता. परंडा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबी पोलीस ठाण्याचे पथक शुक्रवारी, १० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास परिसरात गस्त घालत होते. यावेळी चिंचपूर ते लंगोटवाडी रस्त्यावर काळदाते यांच्या घराजवळ एक न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एमएच १६ बीसी १७४६) संशयितरित्या जाताना दिसला. पथकाने ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता, त्याच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू (गौणखनिज) आढळून आली.
चालक सचिन भांड याच्याकडे वाळू वाहतुकीसंदर्भात कोणताही परवाना किंवा कायदेशीर कागदपत्रे आढळली नाहीत. ही वाळू चोरून आणल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी वाळू आणि ट्रॅक्टर असा एकूण ४ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी अशोक कैलास पव्हणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आंबी पोलीस ठाण्यात आरोपी सचिन भांड विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.