उमरगा : शहरातील राष्ट्रीय महामार्गावर लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन फिरणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला उमरगा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक लोखंडी मूठ असलेली तलवार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी, दि. १५ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास डिग्गी रोड चौकात करण्यात आली.
महेश लालासाहेब दाते (वय २०, रा. काळे कॉलनी, डिग्गी रोड, उमरगा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पोलीस पथक शहरात गस्त घालत होते. त्यावेळी, डिग्गी रोड चौकातील जंजिरा चायनीज सेंटरसमोर, हैदराबादकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर आरोपी महेश दाते हा संशयितरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता, त्याच्या कंबरेला लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशाप्रकारे एक लोखंडी मूठ असलेली पातळ पात्याची तलवार (गावठी कत्ता) विनापरवाना बाळगल्याचे आढळून आले.
पोलिसांनी तत्काळ ती तलवार जप्त केली. याप्रकरणी पोलीस अंमलदार योगेश नामदेव सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महेश दाते याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३, शस्त्र कायदा कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, तो तलवार घेऊन कोणत्या उद्देशाने फिरत होता याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.







