धाराशिव – “विरोधकांना खोटं-नाटं म्हणण्याअगोदर आपण स्वतः आरशात बघा, म्हणजे खरं आणि खोटं कोण आहे ते समजेल,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी भाजप नेते राणा पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “बिहारप्रमाणे धाराशिवमध्ये जनता निर्णय घेईल,” या वक्तव्याचा समाचार घेत, “बिहार व धाराशिवची तुलना करून तुम्ही इथल्या जनतेचा अपमान करू नये,” असे आवाहनही जाधवर यांनी केले आहे.
तानाजी जाधवर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे राणा पाटील यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली. ते म्हणाले, “शहर विकासाच्या गप्पा मारताना आपण विकास कामात केलेली अडवणूक जनता विसरलेली नाही. १४० कोटींच्या रस्ते प्रकरणी भाजपनेच ‘झारीतील शुक्राचार्य’ म्हणून पालकमंत्र्यांकडे बोट दाखविले होते. स्वतःच्या सरकार विरोधात दिखाऊ आंदोलन करून भाजपनेच आपला खरेपणा दाखवून दिला आहे.”
“जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्थगिती देण्यासाठी आपण लावलेली शक्ती जिल्हा विसरलेला नाही आणि त्याचे कारणही ‘खरेपणा’ मिरविणाऱ्या राणा पाटील यांनी अद्याप दिलेले नाही,” असा टोलाही जाधवर यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले, “विरोधातील आमदार असल्याचा मनातील राग थेट जनतेवर काढणारे तुम्ही, आता त्याच जनतेच्या मतासाठी विकासाची नाटकी भाषा करत आहात. हाच तुमच्या खरेपणाचा अजून एक पुरावा आहे. खरेपणा व राणा पाटील यांचा दूरपर्यंत संबंध नाही.”
बिहारच्या निकालावरून राणा पाटील यांच्यावर निशाणा साधताना जाधवर म्हणाले, “बिहारच्या निकालाने राणा पाटील इतके हुरळून गेले की, आपण धाराशिवमध्ये राहतो याचाच त्यांना विसर पडल्याचे दिसत आहे. म्हणूनच त्यांनी बिहारची धाराशिवशी तुलना केली आहे. या अपमानाचे उत्तर जनता तुम्हाला दोन डिसेंबरच्या मतदानाद्वारे नक्की देईल.”






