धाराशिव: धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावरच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीने जागावाटप पूर्ण केले असताना, दुसरीकडे महायुतीमध्ये, विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये, उमेदवारीवरून मोठा संभ्रम आणि बंडखोरीची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपने अद्याप आपले उमेदवारच जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला असून, पक्षांतर्गत नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्ष पदावरून भाजपची डोकेदुखी वाढली
भाजपसमोरील सर्वात मोठी अडचण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून निर्माण झाली आहे. या एका पदासाठी तब्बल २१ जण इच्छुक होते. मात्र, पक्षाने अखेर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांच्या पत्नी नेहा काकडे यांना ‘A फॉर्म’ आणि अक्षय ढोबळे यांच्या पत्नी पूर्वा ढोबळे यांना ‘B फॉर्म’ दिला आहे.
यामुळे उर्वरित १९ इच्छुकांनी बंडाचा झेंडा हाती घेण्याची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. या नाराज इच्छुकांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान भाजप श्रेष्ठींसमोर उभे ठाकले आहे.
महायुती धोक्यात? भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
या निवडणुकीत महायुतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गट बाहेर पडला आहे, त्यामुळे आता फक्त भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची युती आहे. मात्र, या युतीतही सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे.
शिवसेना शिंदे गटाने आपले १७ उमेदवार अधिकृतपणे जाहीर केले आहेत. असे असतानाही भाजपने अद्याप आपली यादी जाहीर केलेली नाही. जर भाजपमधील बंडखोर इच्छुकांनी किंवा पक्षानेच शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केले, तर ही महायुती फिस्कटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप या बंडखोरांची समजूत कशी काढणार आणि महायुतीचा धर्म कसा पाळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीत जागावाटप निश्चित
दुसरीकडे, महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी शरद पवार गट बाहेर पडला आहे. आता शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांची आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप निश्चित झाले असून, शिवसेना ठाकरे गटाने ३१ तर काँग्रेसने १० जागा लढवण्याचे ठरवले आहे. दोन्ही पक्षांनी आपापले अधिकृत उमेदवारही जाहीर केले आहेत.
एकंदरीत, ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये बंडखोरी, नगराध्यक्ष पदावरून नाराजी आणि मित्रपक्षासोबतचा तणाव यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






