धाराशिव आगामी धाराशिव नगर परिषद निवडणुकीत एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड घडण्याची चिन्हे आहेत. राज्यात सत्तेत आणि विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार गट आणि अजित पवार गट) धाराशिवमध्ये मात्र एकत्र येऊन निवडणूक लढवण्यासाठी हालचाली करत आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये सन्मानजनक जागा न मिळाल्याने नाराज झालेले हे दोन्ही पक्ष आता एकत्र आल्यास निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
नाराजीतून नवी समीकरणे
धाराशिव नगर परिषदेसाठी महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र असून, शिंदे गटाने १७ जागा जाहीर केल्या आहेत, तर भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला केवळ ५ जागा देऊ करण्यात आल्या होत्या.
दुसरीकडे, महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. यात ठाकरे गटाला ३१ जागा व नगराध्यक्ष पद, तर काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. येथेही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला केवळ ५ जागांची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर अमान्य करत जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही गटांकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल
आघाड्यांमधून बाहेर पडल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी गटांनी तातडीने पावले उचलली आहेत:
-
राष्ट्रवादी (अजित पवार गट): पक्षाने प्रवक्ते ॲड. विशाल साखरे यांच्या पत्नी ॲड. मंजुषा साखरे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली असून, काही नगरसेवकांना ‘ए बी’ फॉर्म दिले आहेत. तसेच काही अपक्षांना पुरस्कृत करण्याचे धोरण आखले आहे.
-
राष्ट्रवादी (शरद पवार गट): या गटाने माजी नगराध्यक्ष खलिफा कुरेशी यांच्या पत्नी परवीन कुरेशी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे, एकूण ४१ जागांपैकी तब्बल ३१ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
नेत्यांच्या गुप्त बैठका आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा
आता स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी अजित पवार गटाकडून महेंद्रकाका धुरगुडे, तर शरद पवार गटाकडून ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे आणि जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यामार्फत वरिष्ठ नेत्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
जर हे दोन्ही गट एकत्र आले, तर भाजप-शिंदे सेना आणि काँग्रेस-ठाकरे सेना या प्रस्थापित आघाड्यांसमोर मोठे आव्हान निर्माण होईल. यामुळे धाराशिव नगर परिषदेची निवडणूक अधिक चुरशीची आणि रंगतदार होणार, हे नक्की झाले आहे.







