तुळजापूर – तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात मोठा अंतर्गत कलह आणि बंडखोरीची ठिणगी पडली आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी या पदासाठी गिरीगोसावी महंत इच्छागिरी गुरुमहादेवगिरी महाराज यांचे नाव सुचवले होते. मात्र, स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्षश्रेष्ठींच्या या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवत, ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आणि आपला ‘लाडका’ कार्यकर्ता पिटू उर्फ विनोद गंगणे यास उमेदवारी बहाल केली आहे.
राणा पाटलांची नक्की ‘मजबुरी’ काय?
आमदार राणा पाटील यांनी महंतांसारख्या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला डावलून, नुकताच जेलमधून जामिनावर सुटलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पसंती दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विनोद गंगणे हा ड्रग्ज प्रकरणात महिनाभर जेलमध्ये होता आणि सध्या जामिनावर आहे. असे असतानाही, “राणा पाटलांची नक्की काय मजबुरी आहे की त्यांना तुळजापुरात गंगणे शिवाय दुसरा उमेदवार दिसत नाही?” अशी कुजबुज आता केवळ तुळजापुरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभरात सुरु झाली आहे. या निर्णयावर चौफेर टीकेची झोड उठली आहे.
ड्रग्जचा खरा सूत्रधार राणा पाटीलच: खा. ओमराजे निंबाळकर
या सर्व घडामोडींवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. निंबाळकर यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना म्हटले की, “तुळजापूरमधील ड्रग्ज रॅकेटचा खरा सूत्रधार हे आमदार राणा पाटीलच आहेत. त्यामुळेच अशा गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे.”
‘तुळजापूर ड्रग्जमुक्त आणि भयमुक्त करा’
तुळजापूर शहराला लागलेली ही कीड नष्ट करण्यासाठी नागरिकांनी आता पुढे येण्याची गरज असल्याचे ओमराजे यांनी म्हटले आहे. “तुळजापूर ड्रग्जमुक्त आणि भयमुक्त करण्यासाठी अशा प्रवृत्तींना धडा शिकवा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा,” असे आवाहन खा. ओमराजे निंबाळकर यांनी जनतेला केले आहे.
गुन्हेगारांना अभय देण्याची परंपरा?
काही दिवसांपूर्वीच आमदार राणा पाटील यांनी याच ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपी असलेले दोन माजी नगराध्यक्ष, बापू कणे आणि संतोष परमेश्वर कदम, यांना भाजपमध्ये प्रवेश दिला होता. आता थेट मुख्य आरोपीलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने, भाजपने गुन्हेगारांना पुनर्वसन करण्याचे धोरण स्वीकारले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.







