धाराशिव: धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननी दरम्यान, अमित दिलीपराव शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे अमित शिंदे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे.
नेमकी काय होती हरकत?
वादी कृष्णा पंडित मुंडे ( शिवसेना ठाकरे सेनेचे उमेदवार ) यांनी अमित दिलीपराव शिंदे ( भाजपचे शहराध्यक्ष ) आणि वंदना अमित शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. मुंडे यांनी असा दावा केला होता की, अमित शिंदे यांचे नगर परिषदेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळा क्र. १०५ (सीटीएस १०५, शिट नं ५९) मध्ये आर्थिक हितसंबंध आहेत. नगरपालिकेच्या संविदेत (Contract) ज्या व्यक्तीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हितसंबंध असतो, अशा व्यक्तीस कलम १६ (१) अन्वये अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी वादींनी केली होती.
काय झाला युक्तीवाद आणि निर्णय?
या हरकतीवर सुनावणी दरम्यान खालील बाबी समोर आल्या:
-
अमित शिंदे यांनी संबंधित गाळ्याच्या हस्तांतरणाबाबत नोंदणीकृत कागदपत्रे सादर केली आणि या प्रॉपर्टीबाबतचा कर वेळोवेळी भरल्याचे निदर्शनास आणून दिले.
-
कागदपत्रांच्या पडताळणीनंतर, अमित शिंदे यांचा नगरपालिकेशी कोणताही थेट करार (Contract) किंवा ते कंत्राटदार (Tenderer) असल्याचे दिसून आले नाही. त्याबाबत त्यांनी शपथपत्रही सादर केले होते.
-
तसेच, कलम १६ (१) (J) अन्वये नगरपरिषदेच्या कोणत्याही कर्जाऊ रकमेच्या व्यवहारात त्यांची थकबाकी असल्याचे दिसून आले नाही.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा (उदा. बिहार विरुद्ध तानका प्रसाद, रावन्ना सुबन्ना विरुद्ध जी.एस. कागेरप्पा) संदर्भ देत स्पष्ट केले की, हे प्रकरण ‘ऑफीस ऑफ प्रॉफिट’ (Office of Profit) किंवा ‘मास्टर-सर्व्हंट’ (Master-Servant) संबंधांच्या व्याख्येत बसत नाही.
अखेरीस, सर्व कागदपत्रे आणि कायदेशीर बाबी तपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कृष्णा मुंडे यांचा अर्ज अमान्य करत अमित शिंदे यांचा नामनिर्देशन अर्ज वैध असल्याचा निर्णय दिला.







