भूम: स्वस्त सोने खरेदीच्या आमिषाने परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून बोलावून लुटल्याच्या घटना धाराशिव जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. अशीच एक घटना भूम येथे उघडकीस आली आहे. सोने खरेदीसाठी उत्तर प्रदेशातून आलेल्या तिघांना चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात तीन महिलांसह एका व्यक्तीवर जबरदस्तीने चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राधेश्याम फुलेंद्र सरोज (वय ४५, मूळ रा. चिरकोट, ता. लालगंज, जि. आझमगड, उत्तर प्रदेश. सध्या रा. यादव नगर, बोईसर, पालघर) हे त्यांचे मित्र मिश्र बहादूर आणि अखिलेश यांच्यासह सोने खरेदी करण्यासाठी भूम येथे आले होते.
ही घटना १२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १०:३० ते १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० या कालावधीत घडली. फिर्यादी आणि त्यांचे मित्र आरोपींच्या घरी गेले असता, आरोपींनी त्यांना “पैसे घेऊन आलात का?” अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादींनी “आम्ही सध्या पैसे आणले नाहीत,” असे सांगितले.
या गोष्टीचा राग आल्याने आरोपींनी राधेश्याम आणि त्यांच्या मित्रांना चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांच्या खिशातील दोन मोबाईल फोन आणि रोख १५०० रुपये असा ऐवज बळजबरीने काढून घेतला.
आरोपींची नावे
या प्रकरणी राधेश्याम सरोज यांनी १९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. बाळासाहेब पवार
२. शोभा गणेश काळे
३. काजल (पूर्ण नाव समजू शकले नाही)
४. चिवाबाई अतुल काळे
(सर्व रा. भूम)
पोलिसांनी या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम ३०९(६) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास भूम पोलीस करत आहेत. स्वस्त सोन्याच्या नादाला लागून परगावच्या लोकांनी फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे.






