तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गुन्हेगार विनोद गंगणे याला भाजपने चक्क नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. “पार्टी विथ डिफरन्स” म्हणवून घेणाऱ्या भाजपने एका गुन्हेगाराला उमेदवारी दिल्याने आणि स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्याचे उघड समर्थन केल्याने राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे.
गुन्हेगारीचा बायोडाटा, तरीही गळ्यात उमेदवारीची माळ!
विनोद गंगणे हा काही साधा कार्यकर्ता नाही, तर त्याच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यासह इतरत्र खंडणी, खुनाचा प्रयत्न, अपहरण, आणि मटका बुकी चालवणे असे तब्बल १५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तुळजापुरात ड्रग्जचा विळखा घट्ट करण्यात ज्याचा हात असल्याचा आरोप आहे, अशा व्यक्तीला शहराचा ‘प्रथम नागरिक’ बनवण्यासाठी भाजपने पायघड्या घातल्या आहेत.
माजी नगराध्यक्ष पत्नीच्या काळातही भ्रष्टाचाराचा धिंगाणा
गंगणे याच्या पत्नी तुळजापूरच्या नगराध्यक्ष असताना शहरात विकासाऐवजी भ्रष्टाचाराचीच चर्चा जास्त होती. यात्रा अनुदान घोटाळा आणि पालिकेतील अनेक गैरप्रकार याच काळात घडले होते. आता पुन्हा पतीला सत्तेच्या खुर्चीवर बसवून तुळजापूरकरांच्या माथी गुंडगिरी मारण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांतून होत आहे.
“जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा!” – खासदार ओमराजेंचा घणाघात
या प्रकारावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला आहे. “एका कुख्यात गुंडाला उमेदवारी देताना आणि त्याचे समर्थन करताना राणा पाटील यांना जनाची नाही, तर किमान मनाची तरी लाज वाटायला हवी होती,” अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या या ‘गुंडगिरी रिटर्न्स’ धोरणाचा समाचार घेतला आहे.
शक्तीप्रदर्शन की ‘भाड्याची’ गर्दी?
दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज विनोद गंगणे याने शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. मात्र, या रॅलीत तुळजापूरचे स्थानिक नागरिक कमी आणि पैसे देऊन आणलेले बाहेरचे लोकच जास्त होते, अशी चर्चा शहरात रंगली आहे. हे शक्तिप्रदर्शन नसून मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन भाजपने नेमकं काय साध्य करायचं आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.






