धाराशिव: नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तिकीट वाटपावरून अनेक पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले असून, धाराशिवमध्ये भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष प्रसाद मुंडे हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. प्रभाग क्रमांक १३ ( ब ) मधून त्यांच्या मातोश्रीला उमेदवारी डावलल्याने ही नाराजी ओढवल्याचे बोलले जात आहे.
प्रसाद मुंडे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी पक्षाच्या युवा मोर्चाचे शहराध्यक्षपद भूषवले आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी प्रभाग क्रमांक १३ ( ब ) मधून उमेदवारीसाठी पक्षाकडे प्रबळ दावा केला होता. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी त्यांनी प्रामाणिकपणे आणि हिरीरीने काम केले आहे. स्थानिक पातळीवर त्यांचा दांडगा जनसंपर्क असून, प्रभागात त्यांचे भरीव कार्य आहे. असे असतानाही पक्षाने त्यांच्या मातोश्री निशा अनिल मुंडे यांना उमेदवारी देण्यास नकार दिल्याने त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत.
सोशल मीडियावर समर्थकांचा एल्गार
प्रसाद मुंडे यांना डावलल्याचे लक्षात येताच, त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सध्या सोशल मीडियावर, “तुम्ही बांधाल तेच तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच धोरण…” या आशयाच्या पोस्ट जोरदार व्हायरल होत आहेत. या पोस्टमधून मुंडे यांच्या समर्थकांनी अप्रत्यक्षपणे पक्षश्रेष्ठींना इशारा दिला असून, आता प्रसाद मुंडे जो निर्णय घेतील तोच अंतिम असेल, असे संकेत दिले आहेत.
पुढची भूमिका काय?
पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे आता प्रसाद मुंडे बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणार की अन्य काही राजकीय भूमिका घेणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या निर्णयावर प्रभाग क्रमांक १३ मधील निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे.





