धाराशिव: धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, आज (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल साखरे यांनी सोशल मीडियावर टाकलेली एक पोस्ट सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यासाठी किंवा प्रतिस्पर्धी उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी ‘समजूत’ काढण्याचे प्रयत्न होतात. मात्र, ॲड. साखरे यांनी विरोधकांना आणि इतर उमेदवारांना थेट शब्दांत इशारा दिला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
धाराशिव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने ॲड. मंजुषा विशाल साखरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज कायम असून, तो मागे घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे साखरे यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर ॲड. विशाल साखरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, “ॲड. मंजुषा विशाल साखरे यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (माननीय अजित दादा पवार गट) यांचा आहे. तरी उमेदवारी अर्ज काढा म्हणून समजावण्यासाठी कोणीही येऊ नये.”
उमेदवारी धोक्यात येण्याचा इशारा
केवळ अर्ज मागे न घेण्याचे सांगून साखरे थांबले नाहीत, तर त्यांनी समजूत काढायला येणाऱ्यांना कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, “समजावण्यासाठी येणाऱ्या उमेदवाराची कृती आचारसंहिता भंगाच्या कक्षेत येऊ शकते. त्यामुळे समजूत काढायला येणाऱ्या उमेदवाराचाच उमेदवारी अर्ज अपात्र होऊ शकतो, याची नोंद असावी.”
शेवटच्या दिवशी होणाऱ्या राजकीय तडजोडी आणि दबावाच्या राजकारणाला ॲड. साखरे यांनी या पोस्टद्वारे पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्या या रोखठोक भूमिकेची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.







