धाराशिव: आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘कायकल्प’ आणि ‘एनक्यूएएस’ (NQAS) सारख्या तपासण्या केल्या जातात. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने चक्क ‘ट्रॅक्टर’ मधून नागपूरला प्रवास केल्याचे बिल सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अजब कारभाराने आरोग्य विभागातील ‘बोगसगिरी’ चव्हाट्यावर आली असून, या प्रकरणाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार आणि आकाश लहु खंडागळे (रा. केशेगाव) यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीनुसार, केशेगाव (ता. जि. धाराशिव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ‘एनक्यूएएस’ (नॅशनल कॉलिटी ॲश्युरन्स स्टॅंडर्ड) मानांकन तपासणीसाठी नागपूरहून डॉक्टरांचे एक पथक आले होते. या पथकात उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत सत्यदेव कापसे (नागपूर) आणि डॉ. सुनील अप्पासाहेब करूंडवाडे (वैद्यकीय अधिकारी, कोल्हापूर) यांचा समावेश होता.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर हे पथक परत जाताना त्यांनी लातूर ते नागपूर हा शेकडो किलोमीटरचा प्रवास MH-24-D-4011 या वाहनाने केल्याचे दाखवून ६,८७५ रुपयांचे प्रवास भाडे बिल सादर केले. विशेष म्हणजे, आरटीओ नोंदीनुसार हा नंबर एका ‘महिंद्रा ट्रॅक्टर’चा आहे. डॉक्टरांसारखे उच्चपदस्थ अधिकारी शेकडो किलोमीटरचा प्रवास ट्रॅक्टरने कसा करतील? असा सवाल तक्रारदाराने उपस्थित केला आहे.
संगनमताने अपहाराचा आरोप
तक्रारदार खंडागळे यांनी आरोप केला आहे की, केशेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गंगा मुधोळकर यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांशी संगनमत करून ही बोगस बिले तयार केली आहेत.
यामध्ये:
-
ट्रॅक्टरचे बिल: नागपूरच्या ‘ओंकार मल्टीसर्व्हिसेस’ या नावाने लातूरच्या ट्रॅक्टर नंबरचे ६,८७५ रुपयांचे बोगस बिल जोडले.
-
निवास व भोजन: हॉटेल पुष्पक पार्कच्या नावाने ९,२२४ रुपयांचे बिल लावले.
-
थेट खात्यात रक्कम: डॉ. कापसे यांच्या खात्यात १३,८७५ रुपये आणि डॉ. करूंडवाडे यांच्या खात्यात ७,७५४ रुपये वर्ग करण्यात आले.
“जनतेच्या डोळ्यात धूळफेक”
“तपासणीसाठी आलेले डॉक्टर आणि स्थानिक अधिकारी यांनी मिळून शासनाच्या पैशावर डल्ला मारला आहे. लातूरचा ट्रॅक्टर आणि पावती नागपूरची, हा प्रकार थेट जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी तक्रारदार आकाश खंडागळे यांनी केली आहे.
चौकशीचे आदेश
“या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून, प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.”
– डॉ. एस. एल. हरिदास, जिल्हा आरोग्य अधिकारी, धाराशिव.
आरोग्य विभागातील या ‘ट्रॅक्टर सफारी’ची सध्या राज्यभर चर्चा असून, वरिष्ठ अधिकारी यावर काय ‘ऑपरेशन’ करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







