धाराशिव: एका ४९ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिच्या दोन मुलींच्या शिक्षणाची व लग्नाची जबाबदारी घेण्याचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, अत्याचाराचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली होती. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सन २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडले आहे. पीडित महिला ही अनुसूचित जातीची आहे, हे माहिती असूनही आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. त्याने तिला बायकोसारखे वागवून, “तुझ्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी मी घेतो,” असे खोटे आश्वासन दिले. या फसव्या आमिषाला बळी पाडून आरोपीने महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग
आरोपीची मजल एवढ्यावरच थांबली नाही, तर त्याने या अत्याचाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले. जर तू पोलिसांकडे तक्रार केलीस, तर “तुला व तुझ्या मुलींना सोडणार नाही आणि हे व्हिडिओ व्हायरल करीन,” अशी धमकी देऊन त्याने महिलेवर दबाव टाकला.
अखेर या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने २४ नोव्हेंबर २०२५ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ (फसवणूक करून संभोग करणे), ३५१(२) (धमकी देणे) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (Atrocity Act) कलम ३(२) (v-a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.







