धाराशिव: “भुलथापा मारणे आणि हवेतल्या गप्पा करून जनतेची फसवणूक करणे, एवढेच राणा पाटील यांचे कर्तृत्व आहे. त्यांचा विकास हा केवळ कागदावर असून, प्रत्यक्षात होणाऱ्या विकासाला आडकाटी आणणे हीच त्यांची खरी ओळख आहे,” अशी घणाघाती टीका शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केली आहे. राणा पाटील यांनी मांडलेल्या शहर विकासाच्या पाच मुद्द्यांचा समाचार घेताना गुरव यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
राणा पाटील यांनी नुकतेच भविष्यातील शहर विकासाचे पाच ठळक मुद्दे मांडले होते, यावर बोलताना सोमनाथ गुरव यांनी प्रत्येक मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे.
पाणीपुरवठा आणि रस्ते निधीवरून टीका
पहिल्या मुद्द्याचा समाचार घेताना गुरव म्हणाले की, “नियमित पाणीपुरवठा करण्याचा संकल्प राणा पाटलांनी सोडला, पण ते पाणी कसे देणार हे सांगितले नाही. त्यामुळे हा मुद्दा हवेत गप्पा मारल्यासारखा झाला आहे.” रस्त्यांच्या निधीबाबत बोलताना गुरव यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “मर्जीतल्या गुत्तेदाराला काम मिळावे म्हणून रस्त्याच्या कामाची प्रक्रिया २० महिने याच राणा पाटलांनी राबवू दिली नाही. शहरवासीयांना जो त्रास झाला, त्याला तेच जबाबदार आहेत.”
तसेच, ज्या शहरात भुयारी गटार योजना राबवली जाते, तिथे रस्त्यासाठी ५०० कोटींचा निधी मिळत असतो. मात्र, शहराला केवळ १४० कोटी मिळाले. म्हणजे शहराच्या हक्काचा ३६० कोटींचा निधी राणा पाटील यांना आणता आला नाही, असेही गुरव यांनी नमूद केले.
कचरा डेपो आणि उद्यानांचा प्रश्न
सफाई व कचरा डेपोचा प्रश्न सोडवण्याच्या आश्वासनावर गुरव यांनी प्रतिप्रश्न केला की, “गेल्या ४ वर्षांचा प्रशासक काळ असो किंवा २०१९ पर्यंत आमदारकी, सत्ता तुमच्याच हाती होती. मग तेव्हा हा प्रश्न का सुटला नाही? त्यावेळी कंत्राट तुमच्याच लोकांकडे होते. आता पुन्हा तेच करण्यासाठी तुम्ही सत्ता मागत आहात का?”
उद्यान निर्मितीसाठी ५ वर्षांत २५ कोटी आणण्याच्या मुद्द्यावर बोलताना गुरव यांनी महाविकास आघाडीच्या कामांची आठवण करून दिली. “खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून तीन बगीचांसाठी ७ कोटी व आठवडी बाजारासाठी १० कोटी असा निधी मंजूर झाला होता. मात्र, महायुतीचे सरकार येताच या कामांना स्थगिती देण्यात आली. २०२२ पासून ही कामे का केली नाहीत, याचे उत्तर राणा पाटलांनी द्यावे,” असे आव्हान गुरव यांनी दिले.
‘पारदर्शक प्रशासना’चा दावा फोल
पाचवा मुद्दा असलेल्या ‘पारदर्शक प्रशासना’वर बोलताना गुरव यांनी टोला लगावला की, “जनतेने जिल्हा परिषद आणि २०१६ पर्यंत तुमच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेचा कारभार पाहिला आहे. त्यामुळे यावर आपण न बोललेलेच बरे.”
डिसेंबर २०२१ पासून पालिकेवर प्रशासक आहेत आणि २०१४ ते २०१९ या काळात राणा पाटीलच आमदार होते. तरीही, निवडणुकीच्या तोंडावर नुसत्या थापा मारणे आणि हवेत बोलणे सुरू आहे, अशी टीका सोमनाथ गुरव यांनी केली आहे.







