नळदुर्ग : नळदुर्ग नगरपालिकेच्या रणधुमाळीत अशोक जगदाळे हे काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत. मात्र, मतदानासाठी सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मागील पाच वर्षांच्या ‘कारभारी’ काळातील कामाचा लेखाजोखा मांडावा, अशी जोरदार मागणी नळदुर्गमधील जागरूक मतदारांतून होत आहे.
प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक लढवणारे अशोक जगदाळे यांनी मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नशीब आजमावले होते. या काळात त्यांच्या भगिनी रेखाताई जगदाळे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. कागदोपत्री त्या नगराध्यक्ष असल्या तरी नगरपालिकेचा सर्व कारभार आणि सूत्रे अशोक जगदाळे यांच्याच हाती होती, हे संपूर्ण शहराला सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्या काळातील कारभाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी, असे मतदारांचे म्हणणे आहे.
विकासाचे काय झाले?
जगदाळे यांच्या कारकिर्दीत शहराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी नेमके काय प्रयत्न झाले? शहरातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी किंवा गोरगरिबांसाठी कोणत्या ठोस योजना राबविल्या? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या काळात झालेल्या रस्ते आणि गटारींच्या कामांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निधी खर्चूनही स्मारकांची दुरवस्था
शहरातील हुतात्मा स्मारक, रोकड्या हनुमान मंदिर आणि हुतात्मा निलय्या स्वामी उद्यान यांसारख्या महत्त्वाच्या वास्तूंच्या विकासासाठी भरमसाठ निधी खर्च करण्यात आला. तरीही आज या वास्तूंची अवस्था दयनीय का आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर मते मागण्यासाठी येण्यापूर्वी अशोक जगदाळे यांनी आपल्या ‘कारभारी’ कार्यकाळातील कामांचा सविस्तर लेखाजोखा मांडावा आणि त्यानंतरच जनतेसमोर जावे, अशी संतप्त प्रतिक्रिया मतदारांतून उमटत आहे.






