धाराशिव | जिल्हाभरातील आठही नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि. २) शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्याची एकूण मतदानाची सरासरी ६८.९७ टक्के इतकी राहिली असून, तुळजापूरकरांनी सर्वाधिक मतदानाचा हक्क बजावत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर दुसरीकडे, जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिव शहरात मात्र सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे.
आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. आता उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून, मतमोजणीसाठी तब्बल १९ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
तुळजापूरमध्ये विक्रमी मतदान, धाराशिव निरुत्साही
जिल्ह्यात तुळजापूर नगर परिषदेसाठी सर्वाधिक ८०.२८ टक्के मतदान झाले आहे. भवानी मातेच्या नगरीत मतदारांनी दाखवलेला हा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्याखालोखाल भूम (७९.२१%) आणि परंडा (७८.१३%) मध्येही चुरशीने मतदान झाले. मात्र, सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या धाराशिव शहरात मतदारांनी निरुत्साह दाखवला असून, येथे केवळ ६१.१४ टक्के इतके, म्हणजेच जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील ८ नगर परिषदांमधील एकूण २,४३,६७२ मतदारांपैकी १,६८,०५६ मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये ८७,७३८ पुरुष तर ८०,३०२ महिला मतदारांचा समावेश आहे.
नगर परिषद निहाय झालेले अंतिम मतदान (टक्केवारी):
१. तुळजापूर: ८०.२८ % (सर्वाधिक)
२. भूम: ७९.२१ %
३. परंडा: ७८.१३ %
४. नळदुर्ग: ७३.१७ %
५. कळंब: ७२.६९ %
६. मुरूम: ६७.४१ %
७. उमरगा: ६६.८१ %
८. धाराशिव: ६१.१४ % (सर्वात कमी)
एकूण जिल्हा सरासरी: ६८.९७ %
आता २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार आणि कुणाचे पानिपत होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.




