धाराशिव: धाराशिव तालुक्यातील केशेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गंगा मूधोळकर आणि तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोघांनी कार्यालयाशी संबंधित असलेल्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यावरून बोगस बिलांच्या आधारे लाखो रुपयांचा अपहार केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (CEO) करण्यात आली आहे.याबाबत आकाश लहु खंडागळे (रा. केशेगाव) यांनी ३ डिसेंबर २०२५ रोजी सविस्तर तक्रार दाखल केली आहे.
नेमका प्रकार काय?
तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, २०१८ ते २०२५ या कालावधीत हा भ्रष्टाचार झाला आहे. संबंधित दोन्ही डॉक्टरांनी संगनमत करून खालील दोन बँक खात्यांचा गैरवापर केला:
१) आरोग्य अधिकारी यांच्या नावे असलेले आयसीआयसीआय (ICICI) बँकेचे खाते (AC No. 163701001919).
२) रुग्ण कल्याण समितीचे आयसीआयसीआय (ICICI) बँकेचे खाते (AC No. 163701001957).
बोगस बिलांचा खेळ:
या दोन्ही अधिकाऱ्यांनी वरील दोन्ही खात्यांवरून बोगस बिलांच्या आधारे व्यवहार केले आहेत. यासाठी पी.एफ.एम.एस. (PFMS) प्रणालीद्वारे व्हाउचर तयार करण्यात आले तसेच विना जीएसटी (Without GST) बोगस बिले सादर करण्यात आली. या बोगस बिलांच्या माध्यमातून देयके अदा करून ती रक्कम स्वतःच्या (वैयक्तिक) बँक खात्यात ट्रान्सफर करून लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कारवाईची मागणी
शासकीय तिजोरीवर आणि रुग्णांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यांची सखोल चौकशी करावी. अपहार केलेली रक्कम वसूल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी आकाश खंडागळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.








