परंडा: रागावर ताबा नसला की माणसाचा ‘राक्षस’ व्हायला वेळ लागत नाही, याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील भोत्रा येथे घडली आहे. कारण ऐकलं तर तुम्हालाही विश्वास बसणार नाही, पण केवळ ‘कुत्र्याने चप्पल पळवली’ या शुल्लक कारणावरून एका महिलेला लाथाबुक्यांनी तुडवत थेट लोखंडी कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं?
धाराशिव जिल्ह्यातील परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासाळ वस्ती (भोत्रा) येथे १२ डिसेंबर २०२५ च्या सकाळी ६ वाजता हा थरार घडला. फिर्यादी रेश्मा बिरुदेव मासाळ (वय २९) यांच्या घरात एक कुत्रे शिरले आणि त्याने चप्पल पळवली. बसं… एवढंच कारण पुरलं आणि आरोपींच्या संतापाचा पारा चढला.
या कारणावरून वाद घालत आरोपींनी रेश्मा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यातच न थांबता, आरोपींनी थेट लोखंडी कोयता बाहेर काढला आणि रेश्मा यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, “तुला व तुझ्या नवऱ्याला जिवे ठार मारू,” अशी धमकीही दिली.
गुन्हा दाखल झालेले आरोपी:
या प्रकरणी रेश्मा मासाळ यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून परंडा पोलिसांनी खालील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत:
१. शंकर पागरु मासाळ (वय ६०) २. राहुल शंकर मासाळ (वय ३०) ३. सगजान शंकर मासाळ (वय ५०) ४. दिपाली राहुल मासाळ (वय २५) (सर्व रा. मासाळ वस्ती, भोत्रा, ता. परंडा)
शुल्लक कारणावरून रक्ताचे नाते विसरून थेट शस्त्राचा वापर झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) आणि आर्म ॲक्ट ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







